Sunday, April 24, 2016

सोमेश्वर महादेव मंदिर, मागोवा नाशिक नगरीचा...

सोमेश्वर महादेव मंदिर



सोमेश्वर महादेव मंदिर
     बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर तरीदेखील नाशिक नगरीत आणखी एका स्वयंभू महादेव मंदिराची भर पडली ती म्हणजे ‘सोमेश्वर महादेव मंदिर’.  शहराच्या जवळच असलेले गाव गंगापुरजवळ स्थापित असलेले हे मंदिर.
     रामायणात मिळणाऱ्या उल्लेखानुसार एकदा देवसभा सुरु होती, त्यात ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखाने श्री विष्णुंसह महादेवांवर निंदा सुरु केली.  महादेवाने क्रोधाने पाहूनही ब्रह्मदेवाकडून निंदा सुरूच होती.  अखेर क्रोध अनावर झाल्याने ब्रह्मदेवाचे पाचवे मुख छाटून टाकले.  यामुळे सभेत अत्यंत शांतता पसरली.  देवांनी शिव शंकरांचा जयघोष सुरु केला.  ब्रह्महत्येच पातक घडल्यामुळे महादेव खिन्न झाले.  तसेच भगवान शंकराच्या खड्गावर ब्रह्मदेवाचे ते शीर तसेच जिवंत होण्यासाठी काय करावं असा विचार करून त्यांनी पृथ्वी तीर्थाटनासाठी प्रारंभ केला.  वाटेत त्यांना ऋषीमुनी भेटले सांगितले की, ब्रह्महत्येच पातक दूर करण्यासाठी नाशिकच्या सोमेश्वर येथे देवनारायण नावाचा ब्राह्मण सांगेल सांगितले की, पातक घालविण्याचा मार्ग नक्की सापडेल, हे ऐकून शिवशंकर तात्काळ सोमेश्वराच्या ठिकाणी आले.  त्यांच्याकडे असलेली गाय आणि वासरू (नंदी) यांच्यात संवाद सुरु होता, वासरू म्हणाले, ‘माझ्या नाकात वेसन घातली; तर मी त्याला ठार मारेन’, हे ऐकून गाय म्हणाली ‘अरे पण, त्याला मारून तुला ब्रह्महत्येच पातक लागेल’, वासरू म्हणाले, ‘तू काळजी करू नको, ब्रह्महत्येच पातक दूर करण्याचा उपाय मला माहित आहे’, हे ऐकून या वासरावर लक्ष ठेवावे लागेल, असा विचार करून महादेव झोपी गले.  शेतात काम करायचे असल्याने सकाळ होताच ब्राह्मणाने गोठ्यात येवून वासराला वेसन घालण्याचा प्रयत्न केला.  त्यावेळी वासराने ब्राह्मणावर हल्ला केला आणि ब्राह्मणाला ठार केले.  त्यानंतर वासराने गोदावरी नदीच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली हे पाहून भगवान शंकरही त्याच्या मागे गेले.  वासराने रामकुंडाच्या ठिकाणी येवून गोदावरी नदीत डुबकी मारली.  त्यामुळे वासराचे पाय धुतले गेले, वासराने नाकाची बोंडी, शेपटाची गोंडी वर ठेवली.  त्यामुळे नाकाची बोंडी, शेपटाची गोंडी आणि शिंगाचे टोक हा भाग तसाच राहिला.  महादेवांनी हे पाहून रामकुंडात उडी घेत आणि त्यांचेही पाय धुतले गेले अशा प्रकारे हे वासरू भगवान शंकरांचेही गुरु ठरले.  त्यामुळे रामकुंडाच्या समोर कपालेश्वराची स्थापना करण्यात आलेली आहे.  परंतु या ठिकाणी नंदीची स्थापना नाही.  शंकराचे हे एकमेव असे मंदिर आहे की जेथे नंदी नाही.  गंगापूर गावाजवळ सोमेश्वर येथे ब्राह्मणांच्या घराच्या ठिकाणी देवदेवतांची मंदिर स्थापन करण्यात आलेले आहे.  येथे शिवलिंगही आहे हे स्वयंभू असल्याने त्याची मोठी ख्याती आहे.
     नाशिकच्या उत्तरेत म्हणजे नाशिक गंगापूर तलावानजीक सुमारे पाच किलोमीटर अंतरावर सोमेश्वर मंदिर आहे.  गोदावशुद्री नदी किनारी असलेल्या या मंदिराला पुराणकालीन संदर्भ आहेत.  येथे स्वयंभू सोमेश्वर प्रकट झाल्याची आख्यायिका आहे.  येथे सोमेश्वरचे आद्य मंदिर असून मंदिराखालून गुप्त गंगा वाहत असून ती जवळच असलेल्या एका झाडाखालून प्रकट झाल्याचे तसेच तिचा प्रवाह अव्याहत सुरु असल्याचे सांगण्यात येते.  मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आणि नयनमनोहर आहे.  श्रावणात सोमवारी तसेच महाशिवरात्रीला शिवभक्तांची या ठिकाणी अलोट गर्दी असते.  महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारला येथे महाप्रसादाचे वाटप केले जाते.
     श्री सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट गंगापूर मार्फत सर्व नियोजन आणि नियंत्रण केले जाते.  शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयाची सोय येथे उपलब्ध आहे.  सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.  भक्तनिवासाची सोय उपलब्ध आहे.  एकूण १३ खोल्या येथे उपलब्ध आहेत.  भोजन व्यवस्था आहे.  सामाजिक उपक्रमात सहभाग म्हणून विवाह सोहळ्यासाठी मंदिर परिसर दिला जातो.  निसर्गरम्य परिसर असल्याने अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.  विशेष आकर्षण येथे लहानग्यांना आनंद लुटण्यासाठी रेल्वे सफर व बोट सफर येथे आहे.  श्रद्धास्थान व आनंदमयी वातावरण असल्याने हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
श्री सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट गंगापूर :
अध्यक्ष : श्री. मुरलीधर देवराम पाटील
सचिव  : श्री. संतु रुंजाजी पाटील

पुजारी  : श्री. पंडित देवनारायण झा.    

नवश्या गणपती मंदिर, मागोवा नाशिक नगरीचा...

नवश्या गणपती मंदिर
नवश्या गणपती मंदिर
     ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा प्रभू श्रीरामांच्या तपोभूमीत गोदातीरावर वसलेल्या नाशिक नगरीला ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे याचीच साक्ष देणारं गोदातीरावर असलेलं श्री नवश्या गणपती मंदिर.
    श्री नवश्या गणपती मंदिर पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिर आहे.  जागृत देवस्थान म्हणून नवश्या गणपती भक्तांना पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.  नवसाला पावणारा गणपती असा अनुभव अनेक भाविकांना आलेला आहे असे येथे सांगितले जाते.  मंदिराचा ३०० ते ४०० वर्षांचा इतिहास राहिलेला आहे.  इ.स. १७७४ फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली आहे.  माधवराव पेशव्यांचे आनंदवल्ली हे आजोळ गाव.  नाशिक शहरातील गोदातीरावर आनंदवल्ली येथे या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.  त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई नवश्या गणपतीच्या अत्यंत निस्सीम भक्त होत्या.  राघोबा दादा व आनंदीबाईस १५ ऑगस्ट १७६४ ला पुत्रप्राप्ती झाली.  त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले.  या मुलाच्या जन्मप्रित्यर्थ चावंडसचे नाव बदलून आनंदवल्ली असे ठेवले.  त्याचवेळेस मंदिराची उभारणी गोदावरीतिरी पूर्वाभिमुख प्रसन्न गणेश मूर्ती.  या गणेशमूर्तीला चार हात त्यात पाश, मोदक, फूल व आशीर्वाद देतात.  प्रत्येक हातात कडे आहे, डोक्यावर मुकुट आहे.  या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यानंतर श्री नवश्या गणपतीचे दर्शन होते.  इ.स. १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडविली, त्यावेळी आनंदवल्लीचा वाडाही जाळला.  मात्र मंदिरे साबूत राहिली.  श्री नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कार्यकिर्तीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे.
     श्री नवश्या गणपती मंदिर ट्रस्ट तर्फे सामाजिक उपक्रम राबविले जातात.  यात मोफत आरोग्य तपासणी केली जाते.  भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे.  शौचालयाची सोय देखील केलेली आहे.  सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे.  देणगी दानपेट्या व पावती देवून स्विकारली जाते.  मंदिराचे पुजारी शिवाजी बिडकर आहे.  हे मंदिराची पूजा देखभाल करतात.  आरतीचा मान भक्तांनाही दिला जातो, आरतीची वेळ सकाळी ७ वा. व संध्या. ७ वा. अशी आहे.
संकष्ट चतुर्थी, गणेश जयंती यादिवशी महाप्रसादाचे वाटप केले जाते.  गणपती उत्सवात मंदिराची आकर्षक सजावट करण्यात येते व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.  गणपती उत्सवात दहा दिवस महाप्रसाद वा भोजन दिले जाते.  मंदिर ट्रस्ट मार्फत निवास व्यवस्था व भोजनव्यवस्था इत्यादींची सोय येथे उपलब्ध नाही.  मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यासमोर अष्टविनायक दर्शन होते.  अष्टविनायकांची रचना या सभामंडपात केलेली आहे.  मंदिराच्या शेजारी ट्रस्टचे पहिले अध्यक्ष युवराज जाधव यांची समाधी आहे.
     श्री नवश्या गणपतीचे खास आकर्षण ठरते ते बोटसफर (नौकानयन).  थोरामोठ्यांसह लहानगे या सफरीचा मनमुराद आनंद लुटतात.  विशेष म्हणजे या मंदिरापासून सोमेश्वर मंदिराकडे देखील बोटसफर करता येते.  ही बोटसफर महानगरपालिका अधिकृत आहे.
श्री नवश्या गणपती मंदिराकडे जाण्यासाठीगंगापूर शहरबस उपलब्ध आहे.  तसेच रिक्शा व तत्सम साधनांनी देखील जाता येते.  नवश्या गणपती मंदिराचे कामकाज सुव्यवस्थित व पारदर्शकपणे केले जाते.
श्री नवश्या गणपती मंदिर ट्रस्ट
अध्यक्ष : श्री. राजू कळू जाधव
उपाध्यक्ष : श्री. रामचंद्र सिताराम जाधव

सचिव  : श्री. अरुण बाबुराव गाडे    

कालिका माता मंदिर, मागोवा नाशिक नगरीचा...

कालिका मंदिर

कालिका माता मंदिर

     नाशिक तपोभूमिमधील आणि नाशिक नगरीचं आराध्य दैवत कालिका माता होय.  नाशिक नगरीतील भाविक शुभकार्याची सुरुवात या ग्रामदैवत गडकरी चौकाजवळील कालिका मातेच्या शुभाशिर्वादाने करतात.  या मंदिराचा जीर्णोद्धार १९७४ साली नगराध्यक्ष वसंतराव गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.  या मंदिराच्या वास्तूची रचना आर्किटेक्ट ग. ज. म्हात्रे यांच्या उत्कृष्ट संकल्पनेतून साकारण्यात आली आहे.  मंदिराचा गाभारा पूर्वी लाकडी स्वरुपात होता.  त्याच रुपात उच्च प्रतीच्या मार्बलमध्ये गाभाऱ्याची पुर्नबांधणी करण्यात आली.  मंदिरासाठी उच्च प्रतीच्या मार्बलबरोबर उच्च प्रतीची फरशी देखील बसविण्यात आलेली आहे.    
     कालिका मातेच्या मंदिराची भव्य–दिव्य स्वरूपात वास्तू उभारण्यात आलेली आहे.  भाविकांना नेहमी भुरळ घालणारी अशी मंदिराची वस्तू उभारण्यात आली आहे.  मंदिर परिसरात वृक्ष लागवड, परसबाग देखील तयार केलेली आहे.  भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या सोयीबरोबर शौचालयाची सोयही केलेली आहे.  सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.  भाविकांच्या निवासासाठी नुकतीच भक्तनिवास इमारतीची पायाभरणी करण्यात आली आहे . भक्तनिवासाची रचना जास्तीत जास्त ५० ते ६० भक्तांना या निवासाचा लाभ घेता येईल अशा पद्धतीने बांधण्यात येणार आहे.
     कालिका माता ग्रामदैवत असल्याने स्थानिक भाविकांबरोबर इतर भाविकांची देखील अपार श्रद्धा या देवीवर आहे.  भक्तांना पावणारी देवी म्हणून कालिका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक श्रद्धेने येतात.  अनेक भाविकांनी देवीला नवस केलेला असल्याने नवस फेडण्यासाठी येथे येत असतात.  मंदिरात तीन समया अखंड प्रज्वलित असतात .कालिका मातेच्या भक्तीची प्रचिती अनेक भाविकांना आल्याचे भाविकांनी पुजाऱ्यांना सांगितलेले आहे.  या मंदिराचे पहिले पुजारी देविदास बाबा होते.  सध्या किशोर पुराणिक हे देवीची पूजा करतात.  देवीची आरती पुजारी आणि अतिथी, भाविकांना देखील या देवीची आरती करण्यास दिले जाते.  आरतीची वेळ सकाळी ७ वा. आणि संध्या. ७ वा.  असते.  मंदिराची वेळ सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत असते.  पोर्णिमा, नवरात्र उत्सव यावेळेस मंदिर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू असते.  मंदिर परिसर निसर्गाने फुललेला नेहमी दिसतो . अनेक भाविक या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या बागेत लहानग्यासह आनंद लुटतात.  प्रसादाबरोबर खेळणीही खरेदी करतात.  कालिका मातेचा आशीर्वाद या भक्तांबरोबर संपूर्ण नाशिक नगरीवर नेहमी राहणारा सर्वांचे रक्षण करणारी देवी म्हणून कालिका माता ओळखली जाते. 
     कालिका मातेच्या मंदिराचे खास आकर्षण असते ते नवरात्र उत्सव.  नवरात्र उत्सवात मंदिराची खास आकर्षक सजावट करण्यात येते.  दहा दिवस येथे यात्रा चालू असते भाविकांची मांदियाळी यावेळेस येथे असते.  भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात.  देवीला चांदीच्या मुकुटासह दागदागिनेचे आभूषणांनी सजविण्यात येते.
     श्री कालिका माता मंदिर ट्रस्ट सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात.  देवीला येणारे धान्य सेवाभावी संस्था, अनाथाश्रमाला देण्यात येते.  श्री कालिका मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकावरून रिक्क्षा वा पायी जाता येते.  नाशिक रेल्वेस्थानकावरून शहर बस वा रिक्क्षाने जाता येते.
श्री कालिका माता मंदिर ट्रस्ट
अध्यक्ष : श्री. केशवराव (आण्णा) गुलाबराव पाटील
सचिव  : डॉ. श्री. प्रतापराव उत्तमराव कोठावळे
कोषाध्यक्ष : श्री. सुभाषभाई मगनभाई तळाजिया

Website     :  www.kalikamatamandirtrust.org

वेद मंदिर, मागोवा नाशिक नगरीचा...

वेद मंदिर

वेद मंदिर

     पवित्र गोदावरी नदीच्या किनारी वसलेली नाशिक नगरी भगवान श्रीराम यांच्या तपोभूमी आणि महान ऋषीमुनी यांनी तपश्चर्या वा साधना केलेलं हे ठिकाण आहे.  पुण्यभूमी नाशिकची अध्यात्मिक आणि उज्ज्वल सांस्कृतिक परंपरामध्ये मंगलमयी वास्तूचा समावेश झाला आहे.  अद्भुत वास्तूचे नाव ‘श्री गंगेश्वर वेदमंदिर’ असे आहे.
     श्री गुरु गंगेश्वर वेद मंदिराचे प्रवर्तक व निर्माते सेठ श्री. किसनलालजी सारडा आणि त्यांची पत्नी सौ. किरणदेवी सारडा यांनी स्वर्गीय पूज्य पिताजी श्री. बस्तीरामजी सारडा यांच्या प्रित्यर्थ मातोश्रीच्या नावाने या ट्रस्टची स्थापना केली.  सध्या ‘मातोश्री रामप्यारीबाई सारडा धार्मिक प्रतिष्ठान’ म्हणून ट्रस्ट कार्यरत आहे.
     श्री गुरु गंगेश्वर वेद मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा दिनांक २३ जानेवारी १९८८ ला स्वयं गुरु गंगेश्वरनंदजीच्या हस्ते झाले.  मंदिराची लांबी ८२ चौ. फुट व रुंदी ६५ चौ. फुट आणि उंची ७८ चौ. फूट आहे.  ही वास्तू साकार करण्यासाठी राजस्थान आणि गुजरातच्या कामगारांनी ३ वर्ष दिवसरात्र मेहनत करून आकर्षक मंदिराची उभारणी केलेली आहे.   
वेद विहित तुम्ही आईका हो कर्मे I बोलती ती वर्मे संतांपुढे II
वेद शास्र नाही पुराण प्रमाण I तयाचे वदन नावलोका II
     मुख्य मूर्ती संगमरवर दगडाची आहे.  याबरोबरच गुरु गंगेश्वरानंदजी यांची कांस्याची मूर्ती आहे. ‘गुरुगंगेश्वर आणि वेद मंदिर’ यांच्या नावामागे एक आख्यायिका आहे, त्यामुळे या मंदिराला विशेषत्व प्राप्त होते.  वेद परम ज्ञानाचे प्रतिक मानले जाते, तर गुरुगंगेश्वरानंदजी         परम साधनेचे प्रतिक मानले जाते.  पूज्य गुरु प्रकाश स्वरूप स्वामी गंगेश्वरानंदजी उच्च     कोटीचे विद्वान होते.  पूज्य गुरु गंगेश्वरानंदजींचा जन्म २७ डिसेंबर १८८१ ला पंजाब मध्ये झाला आणि महानिर्वाण वयाच्या १११ व्या वर्षी फेब्रुवारी १९९२ ला झाले.  विश्वातील एक अनोखे साधू होते.  प्रज्ञाचक्षुही होते, तसेच चारही वेद त्यांच्या तोंडपाठ होते. मंत्र आणि अर्थ यांचे परिपूर्ण ज्ञान त्यांना होते.  गुरुदेव यांचे संपूर्ण जीवन ‘वेद भगवान’ साठी समर्पित केले होते. गुरुदेव यांनी प्राचीन ग्रंथ वेद जे वेगवेगळे झाले होते. त्यांचे संकलन करून शुद्ध रुपात विशेष कागदावर शुद्ध शाई आणि विशेष प्रिंट करून ‘भगवान वेद’ यांच्या ११०० प्रती छापल्या.                             या प्रती आज विश्वात सर्वात शुद्ध मानल्या जातात.  या ग्रंथांचा पूजा आणि अभ्यास मंदिर, विश्वविद्यालये, मठ व मान्यवरांच्या घरी केली जाते.  वेद शाळांमध्ये सूद्धा आजकाल शिकविले                  जात आहे.  तिथे आजपण गुरु शिष्य परंपरांत वेदाचे शिक्षण दिले जाते.  यामुळेच त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या वेद मंदिरात केली आहे.
     याबरोबरच प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मणजी आणि देवी सीतामाई यांच्याही संगमरवरी दगडापासून ६ फूट उंचीच्या मूर्ती जयपूरहून बनवून आणलेल्या आहे.  यांचे वस्र आणि दागिने मथूराहून बनवून आणलेले आहे.  त्यांच्या समोरच हनुमानाची मूर्तीची स्थापना केलेली आहे. 
     तसेच बारा ज्योतिर्लिंगमधील  एक त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानी आहे. यामुळे वेद मंदिराच्या उजव्या बाजूला शिवलिंग, पार्वती, नंदी यांच्या मूर्ती आहेत. शिवलिंग काळ्या दगडापासून तयार केलेले असून वजन १७०० कि.ग्रॅ. आहे. नंदीच्या मूर्तीचे वजन ९०० कि.ग्रॅ. आहे. याबरोबर                          शिवलिंगाची मूर्तीपण येथे आहे. प्रवेशद्वाराजवळ विघ्नहर्ता गणेशाची मंगलमय मूर्तीची स्थापना केलेली आहे.

     श्री गुरुगंगेश्वर वेद मंदिर नवीन मध्यवर्ती बसस्थानकच्या १० ते १५ मीटर अंतरावर आहे. रिक्क्षा वा पायी या मंदिराकडे जाता येते.  विलक्षण आकर्षण असलेले हे वेद मंदिर मायको सर्कल जवळ  आहे.  मंदिरात पुजारी सर्व देखभाल तर करतात, तसेच मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे.  तसेच मंदिरात वेद पठन, भजन सतत चालू असते.  स्थानिक भाविक या मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर येतात परंतु आल्हाददायक वातावरण असल्याने बराचसा वेळ येथे व्यतीत करतात. 

मुक्तिधाम मंदिर, मागोवा नाशिक नगरीचा...

 मुक्तीधाम मंदिर 

मुक्तिधाम मंदिर 
     पवित्र गोदावरी नदी तीरावर वसलेले नाशिक नगरी भगवान श्रीराम यांची तपोभूमी वा महान ऋषी मुनी यांचे साधना स्थळ म्हणून पवित्त पावन झालेली आहे.  या पवित्र नाशिक भूमीत अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरामध्ये आणखी भर पडली ती मुक्तीधाम मंदिर या वास्तूची. 
     पवित्र मुक्तीधाम मंदिराची स्थापना १९६७ ला नशिक रोड परिसरात झाली.  या मंदिराचे मुख्य प्रवर्तक श्री. जयरामभाई डायाभाई चौहान (नाशिक) हे आहे.  त्यांच्या अपार भक्ती व उच्च कोटीच्या संकल्पनेतून या मंदिराची स्थापना झाली.  मंदिराचे खास वैशिष्टय म्हणजे चारही धाम या ठिकाणी पहायला मिळतात. चारही धामांची रचना या मंदिरात केलेली आहे.  यातील खास आकर्षण ठरते, ‘कैलास पर्वत’ महादेवाचे वास्तव्य असलेल्या कैलास पर्वताची रचना या मंदिरात साकारण्यात आलेली आहे.  गाभाऱ्यासमोरील सभामंडप हा भव्य-दिव्य आकारात बांधलेला असून कुठल्याही प्रकारच्या खांबांचा आधार यासाठी घेतलेला नाही.  मंदिराच्या बांधकामासाठी चांगल्या प्रतीचे मार्बल आणि फरशी वापरण्यात आलेली आहे.  मंदिरात सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही बसविण्यात आलेले आहे.  मंदिरात पुजेसाठी स्थानिक पुजारी आहेत.                      
     या मुक्तीधाम मंदिराचे कामकाज श्री मुक्तीधाम मंदिर ट्रस्ट मार्फत केले जाते. मंदिर व मंदिर परिसरातील स्वच्छतेबरोबर नियोजन व नियंत्रण केले जाते.  भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आणि शौचालयाची सोय देखील येथे केलेली आहे.  बाहेरून आलेल्या भक्तांसाठी भक्तनिवास बांधण्यात आले आहे.  या भक्त निवासात १५० खोल्या आहेत.  भोजन व्यवस्था देखील केलेली आहे.  भोजन व्यवस्थेत हाफ थाळी ४० रु., फुल थाळी ८० रु. अशी रक्कम यासाठी आकारण्यात येते.  भोजनाची वेळ सकाळी ११.३० ते दुपारी २ .३० आणि संध्याकाळी ७.३० ते रात्री ९.३० पर्यंत  असते.  मंदिरात देणगी स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.
     मंदिरात स्थानिक भाविकांबरोबर महाराष्ट्राबाहेरील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.  मंदिरातील आरती पुजारी आणि आलेल्या अतिथीकडून केली जाते.  आरतीची वेळ सकाळी ७ वा., दुपारी १२ वा. व संध्या. ७ वा. आणि रात्री ९ वा. असते.  विशेषत: सर्व देवदेवता यांचे दर्शन या मंदिरात घ्यायला मिळ्ते.  भाविकांना चारही धामांचे दर्शन नाशिकमध्येच घ्यायला मिळते याचा पुरेपूर लाभ भाविक घेतात.  मंदीर ट्रस्टमार्फत १० रुपयांत प्रसाद पाकीट मिळते.  शहरातील अबालवृद्ध आणि लहानग्यांसह अनेक भाविक येथे दर्शनाला आल्यानंतर बराचसा वेळ या मंदिर परिसरात घालवितात.
     मंदिर ट्रस्टचा सामाजिक कामात सहभाग असतो.  मंदिर ट्रस्टमार्फत मोफत रुग्णतपासणी केली जाते.  मंदिर परिसरात प्रवचन हॉल बांधलेला आहे.  यज्ञ मंदिर बांधलेले आहे.  अशा भव्य-दिव्य आवारात या मंदिराची उभारणी केलेली आहे.  मंदिराकडे येण्यासाठी नाशिक रोडजवळून रिक्क्षा व पायी देखील येता येते.  नाशिक बसस्थानकावरून शहरबस (नाशिक रोड) व तत्सम साधने, रिक्क्षाद्वारे देखील जाता येते.

श्री मुक्तीधाम मंदिर ट्रस्ट : व्यवस्थापकीय संचालक श्री. हिरालाल जयरामभाई चौहान