Sunday, April 24, 2016

मुक्तिधाम मंदिर, मागोवा नाशिक नगरीचा...

 मुक्तीधाम मंदिर 

मुक्तिधाम मंदिर 
     पवित्र गोदावरी नदी तीरावर वसलेले नाशिक नगरी भगवान श्रीराम यांची तपोभूमी वा महान ऋषी मुनी यांचे साधना स्थळ म्हणून पवित्त पावन झालेली आहे.  या पवित्र नाशिक भूमीत अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरामध्ये आणखी भर पडली ती मुक्तीधाम मंदिर या वास्तूची. 
     पवित्र मुक्तीधाम मंदिराची स्थापना १९६७ ला नशिक रोड परिसरात झाली.  या मंदिराचे मुख्य प्रवर्तक श्री. जयरामभाई डायाभाई चौहान (नाशिक) हे आहे.  त्यांच्या अपार भक्ती व उच्च कोटीच्या संकल्पनेतून या मंदिराची स्थापना झाली.  मंदिराचे खास वैशिष्टय म्हणजे चारही धाम या ठिकाणी पहायला मिळतात. चारही धामांची रचना या मंदिरात केलेली आहे.  यातील खास आकर्षण ठरते, ‘कैलास पर्वत’ महादेवाचे वास्तव्य असलेल्या कैलास पर्वताची रचना या मंदिरात साकारण्यात आलेली आहे.  गाभाऱ्यासमोरील सभामंडप हा भव्य-दिव्य आकारात बांधलेला असून कुठल्याही प्रकारच्या खांबांचा आधार यासाठी घेतलेला नाही.  मंदिराच्या बांधकामासाठी चांगल्या प्रतीचे मार्बल आणि फरशी वापरण्यात आलेली आहे.  मंदिरात सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही बसविण्यात आलेले आहे.  मंदिरात पुजेसाठी स्थानिक पुजारी आहेत.                      
     या मुक्तीधाम मंदिराचे कामकाज श्री मुक्तीधाम मंदिर ट्रस्ट मार्फत केले जाते. मंदिर व मंदिर परिसरातील स्वच्छतेबरोबर नियोजन व नियंत्रण केले जाते.  भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आणि शौचालयाची सोय देखील येथे केलेली आहे.  बाहेरून आलेल्या भक्तांसाठी भक्तनिवास बांधण्यात आले आहे.  या भक्त निवासात १५० खोल्या आहेत.  भोजन व्यवस्था देखील केलेली आहे.  भोजन व्यवस्थेत हाफ थाळी ४० रु., फुल थाळी ८० रु. अशी रक्कम यासाठी आकारण्यात येते.  भोजनाची वेळ सकाळी ११.३० ते दुपारी २ .३० आणि संध्याकाळी ७.३० ते रात्री ९.३० पर्यंत  असते.  मंदिरात देणगी स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.
     मंदिरात स्थानिक भाविकांबरोबर महाराष्ट्राबाहेरील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.  मंदिरातील आरती पुजारी आणि आलेल्या अतिथीकडून केली जाते.  आरतीची वेळ सकाळी ७ वा., दुपारी १२ वा. व संध्या. ७ वा. आणि रात्री ९ वा. असते.  विशेषत: सर्व देवदेवता यांचे दर्शन या मंदिरात घ्यायला मिळ्ते.  भाविकांना चारही धामांचे दर्शन नाशिकमध्येच घ्यायला मिळते याचा पुरेपूर लाभ भाविक घेतात.  मंदीर ट्रस्टमार्फत १० रुपयांत प्रसाद पाकीट मिळते.  शहरातील अबालवृद्ध आणि लहानग्यांसह अनेक भाविक येथे दर्शनाला आल्यानंतर बराचसा वेळ या मंदिर परिसरात घालवितात.
     मंदिर ट्रस्टचा सामाजिक कामात सहभाग असतो.  मंदिर ट्रस्टमार्फत मोफत रुग्णतपासणी केली जाते.  मंदिर परिसरात प्रवचन हॉल बांधलेला आहे.  यज्ञ मंदिर बांधलेले आहे.  अशा भव्य-दिव्य आवारात या मंदिराची उभारणी केलेली आहे.  मंदिराकडे येण्यासाठी नाशिक रोडजवळून रिक्क्षा व पायी देखील येता येते.  नाशिक बसस्थानकावरून शहरबस (नाशिक रोड) व तत्सम साधने, रिक्क्षाद्वारे देखील जाता येते.

श्री मुक्तीधाम मंदिर ट्रस्ट : व्यवस्थापकीय संचालक श्री. हिरालाल जयरामभाई चौहान 

No comments:

Post a Comment