नवश्या गणपती मंदिर
![]() |
| नवश्या गणपती मंदिर |
ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा प्रभू
श्रीरामांच्या तपोभूमीत गोदातीरावर वसलेल्या नाशिक नगरीला ऐतिहासिक वारसा देखील
लाभलेला आहे याचीच साक्ष देणारं गोदातीरावर असलेलं श्री नवश्या गणपती मंदिर.
श्री नवश्या गणपती मंदिर पेशवेकालीन ऐतिहासिक
मंदिर आहे. जागृत देवस्थान म्हणून नवश्या
गणपती भक्तांना पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
नवसाला पावणारा गणपती असा अनुभव अनेक भाविकांना आलेला आहे असे येथे
सांगितले जाते. मंदिराचा ३०० ते ४००
वर्षांचा इतिहास राहिलेला आहे. इ.स. १७७४
फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना
केली आहे. माधवराव पेशव्यांचे आनंदवल्ली
हे आजोळ गाव. नाशिक शहरातील गोदातीरावर
आनंदवल्ली येथे या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई नवश्या गणपतीच्या
अत्यंत निस्सीम भक्त होत्या. राघोबा दादा
व आनंदीबाईस १५ ऑगस्ट १७६४ ला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. या मुलाच्या जन्मप्रित्यर्थ चावंडसचे नाव बदलून
आनंदवल्ली असे ठेवले. त्याचवेळेस मंदिराची
उभारणी गोदावरीतिरी पूर्वाभिमुख प्रसन्न गणेश मूर्ती. या गणेशमूर्तीला चार हात त्यात पाश, मोदक, फूल
व आशीर्वाद देतात. प्रत्येक हातात कडे
आहे, डोक्यावर मुकुट आहे. या
राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यानंतर श्री नवश्या गणपतीचे दर्शन होते. इ.स. १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडविली,
त्यावेळी आनंदवल्लीचा वाडाही जाळला. मात्र
मंदिरे साबूत राहिली. श्री नवश्या गणपती
मंदिर हे पेशव्यांच्या कार्यकिर्तीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे.
श्री नवश्या गणपती मंदिर ट्रस्ट तर्फे सामाजिक
उपक्रम राबविले जातात. यात मोफत आरोग्य
तपासणी केली जाते. भक्तांसाठी पिण्याच्या
पाण्याची सोय केलेली आहे. शौचालयाची सोय
देखील केलेली आहे. सुरक्षिततेसाठी सीसी
टीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. देणगी
दानपेट्या व पावती देवून स्विकारली जाते.
मंदिराचे पुजारी शिवाजी बिडकर आहे.
हे मंदिराची पूजा देखभाल करतात.
आरतीचा मान भक्तांनाही दिला जातो, आरतीची वेळ सकाळी ७ वा. व संध्या. ७ वा.
अशी आहे.
संकष्ट चतुर्थी, गणेश जयंती यादिवशी महाप्रसादाचे
वाटप केले जाते. गणपती उत्सवात मंदिराची
आकर्षक सजावट करण्यात येते व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गणपती उत्सवात दहा दिवस महाप्रसाद वा भोजन दिले
जाते. मंदिर ट्रस्ट मार्फत निवास व्यवस्था
व भोजनव्यवस्था इत्यादींची सोय येथे उपलब्ध नाही.
मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यासमोर अष्टविनायक दर्शन होते. अष्टविनायकांची रचना या सभामंडपात केलेली
आहे. मंदिराच्या शेजारी ट्रस्टचे पहिले अध्यक्ष
युवराज जाधव यांची समाधी आहे.
श्री नवश्या गणपतीचे खास आकर्षण ठरते ते बोटसफर
(नौकानयन). थोरामोठ्यांसह लहानगे या
सफरीचा मनमुराद आनंद लुटतात. विशेष म्हणजे
या मंदिरापासून सोमेश्वर मंदिराकडे देखील बोटसफर करता येते. ही बोटसफर महानगरपालिका अधिकृत आहे.
श्री नवश्या गणपती मंदिराकडे जाण्यासाठीगंगापूर
शहरबस उपलब्ध आहे. तसेच रिक्शा व तत्सम
साधनांनी देखील जाता येते. नवश्या गणपती
मंदिराचे कामकाज सुव्यवस्थित व पारदर्शकपणे केले जाते.
श्री नवश्या गणपती मंदिर ट्रस्ट
अध्यक्ष : श्री. राजू कळू जाधव
उपाध्यक्ष : श्री. रामचंद्र सिताराम जाधव
सचिव :
श्री. अरुण बाबुराव गाडे

No comments:
Post a Comment